वेळीच ओळखा शोग्रेन्स सिन्ड्रॉमचा धोका – शोग्रेन्स सिन्ड्रॉम जागरूकता दिवस

२३ जुलै हा दिवस शोग्रेन्स सिन्ड्रॉम जागरूकता दिवस म्हणून साजरा केल्या जातो. संधिवात हा आधीच एक दुर्मिळ आजार आहे व त्यामध्ये शोग्रेन्स हा आजार हा जवळपास प्रकार सर्वच ७० ते ८० संधीवातांच्या प्रकारात, वेगवेगळ्या लक्षणांद्वारे प्रकट होणारा संधिवात आहे. या लेखातून जाणून घेऊया, काय असतो शोग्रेन्स सिन्ड्रॉम…!
सर्वांना वाटत असेल की, नावच इतके विचित्र “शोग्रेन” तर आजारही विचित्रच असेल….! अर्थात तुम्ही १०० टक्के बरोबर आहात…! हा संधीवात नावाप्रमाणेच बराच विचित्र आहे. अर्थात तो आहे संधीवात (सांधे-वात)…! पण लक्षणे मात्र भलतीच आणि ती सुद्धा कोरडी !! आपण ते सर्व पुढे सविस्तर पाहू. पण सर्वात पहिल्यांदा हे नाव कुठून आले तर? “हेनरिक शोग्रेन” या स्वीडिश नेत्रशल्यचिकित्सकाच्या नावावरून हा आजार ओळखला जातो. कारण डॉक्टर शोग्रेन हे पहिले चिकित्सक होते, ज्यांनी हे शोधून काढले की, अशा प्रकारच्या संधीवातात सांधे दुखी नाही, तर डोळ्यांना कोरडेपणा येणे, तोंडाला कोरडेपणा येणे अशी लक्षणे प्रामुख्याने आढळून येतात. या आजाराची लक्षणे ही वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहू शकतात किंवा त्यांचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो व निदान करण्यास दीर्घकाळ लागू शकतो. म्हणून जागरूकता दिवसाच्या निमित्ताने जनजागृती करण्यास मदत होते.

शोग्रेन्स सिन्ड्रॉमची कारणे…!!!
आता आपण पाहू शोग्रेन्स होण्याची कारणे काय आहेत? तर कोणत्याही ऑटोइम्युन आजार म्हणजे स्वयंप्रतिकार रोगात आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या यंत्रणेमध्ये काही बिघाड होतो व तो आपल्या शरीरातील अवयवांवर अथवा सांध्यावर हल्ला करण्यास सुरुवात करतो. पण शोग्रेन मध्ये हा हला विशेष करून ओलावा उत्पन्न करणार्‍या ग्रंथींवर होतो. उदाहरणार्थ तोंडामध्ये लाळ ग्रंथी, डोळ्यांमधील अश्रु ग्रंथी इत्यादी. ग्रंथीची कार्यक्षमता ते कमी करतात व हळूहळू शरीरामध्ये तोंडाला, डोळ्याला, त्वचेला कोरडेपणा जाणवायला लागतो.

शोग्रेन कोणामध्ये होतो?
हा विशेष प्रकारचा संधिवातविशेष करून स्त्रीयांमध्ये होतो. तो साधारणपणे ४५-५५ वयोगटात अधिक आढळून येतो. शोग्रेनचे मुख्य लक्षणे ही प्राथमिकतः स्वतंत्रपणे किंवा अन्य ऑटोइम्युन आजार (उदा रुमॅटॉईड आर्थरायटिस, एसएलई, सीटीडी इ) सोबत आढळून येतात.

शोग्रेनची लक्षणे काय असतात
शोग्रेन हा संधिवात खालील ४ पद्धतींनी शरीरावर प्रकट होऊ शकतो.
१) sicca ची (सिक्का) लक्षणे
सिक्का हा लॅटीन शब्द असून त्याचा अर्थ मराठीत कोरडेपणा असा होतो. जर तुम्हाला जीभेला सारखा कोरडेपणा जाणवत आहे, तोंडात जळजळ होत आहे, वारंवार पाणी पिऊनही तहान भागत नाही, घास गिळण्यास त्रास होतो, दीर्घ वेळ बोलण्यास अडचण होते, दात किडणे इत्यादी त्रास होतो, तर ते तोंडाला येणार्‍या कोरडेपणामुळे होऊ शकते. जर तुम्हाला डोळ्याला लाली येणे, कचरा गेल्यासारखे वाटणे, जळजळ, पाणी येणे इत्यादी त्रास होत असेल तर तो डोळ्यांच्या कोरडेपणामुळे होऊ शकतो.

२) ग्रंथींना सुज येऊन ग्रंथींचा आकार कमी जास्त होणे

३) सामान्य लक्षणे जसे सर्वसाधारण थकवा, शरीरदुखी, सांधेदुखी इत्यादि

४) ग्रंथीव्यतिरीक्त शरीरात शोग्रेन ज्या अवयवांवर हल्ला करतो, त्या अवयवांना आढळून येणारी लक्षणे उदा. सांधे व स्नायुंची यंत्रणा, किडनी, नसांना येणारी सुज, त्वचा, यकृत, फुफ्फुस यांच्या कार्यान्वयनात प्रभाव होऊ शकतो

शोग्रेनचे निदान कसे होते?
शोग्रेनया दुर्मिळ संधीवाताचे निदान रक्ताच्या तपासण्या, लाळ ग्रंथीच्या विशेष तपासण्या, डोळ्यांच्या अश्रुग्रंथीच्या विशेष तपासण्या व कधी-कधी ग्रंथीचा छोटा तुकडा काढून (बायप्सी) निदान करण्यासाठी त्याची तपासणी केली जाऊ शकते.

शोग्रेनवर औषधोपचार काय आहे?
शोग्रेन हा संधिवात शरीरात नेहमी राहतो; तो बरा होऊ शकत नाही. डोळ्याच्या कोरडेपणा, तोंडाचा कोरडेपणा किंवा संधिवाताची गंभीरता अधिक असल्यास विविध अद्ययावत औषधांची मदत घेऊन तज्ज्ञ आजार नियंत्रणात आणण्यास मदत करतात. जेणेकरून जीवन जगणे हे सोयीस्कर होऊ शकते.

शेवटी असे म्हणतात, डोळ्यातून पडणारे अश्रु हे जणू शब्द असतात, जे आपले हृदयही सांगू शकत नाही. पण मला हे वाटते शोग्रेन बद्दल माहिती समजल्यावर तुम्हाला पण जाणवेल की, डोळ्यात अश्रु नसणे, हे सुद्धा कधी-कधी दुःखाची सर्वोच्च परिसीमा असते.

Speak up for Sjogren…!
There can be something deep beneath dryness…!
डॉ. प्राची पाटील
संधीवातरोगतज्ज्ञ, नाशिक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *